अनोखी सफर

                           अनोखी सफर
    प्रवास तशी खूप रंजक आणि उत्सुकता क्षितिजा वर नेऊन ठेवणारी गोष्ट. प्रवास वर्णन म्हणजे काय तर शब्दरूपी पुष्पांनी आयुष्यातिल क्षणांची केलेली सजावट, थोडक्यात आपण केलेल्या प्रवासाची शब्दांत केलेली मांडणी. एखाद्या पर्यटन स्थळाच्या प्रवासाचे वर्णन केले जाऊ शकते पण ना त्यांच्या प्रवासाचे वर्णन कोणत्या शब्दात करावे हे सुचणे थोडेसे कठीणच.
     मैत्रीच्या नात्याला मजबूत करणारा एक प्रवास, प्रवासाच्या माध्यमातून मैत्रीचा अभूतपूर्व संगम घडवून आणण्याचा प्रयत्न म्हणजेच 20 विशेष दृष्टीचे आणि 20 डोळस विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केलेली उत्तर भारत सफर. कोण नव्हतं या सफरीत म्हणून विचारा सूर्याचा प्रकाश द्यायला स्वतः भास्कर आणि प्रकाश ही जोडी होती. एकाही देवस्थानाला भेट दिली नाही तरी अमृता मुळे या सफरीत अमृताची गोडी होती. हिमालयात जरी गेलो नसलो तरी स्वतः कैलास आमच्या सोबत होता. जय विरू समजले जाणारे तेजस, अनिकेत आणि सोबत राम लखन अशा फिल्मी पार्टनरच्या सुद्धा जोड्या आमच्याकडे होत्या. नावातच बारा व्यक्तींची कार्यक्षमता असलेले अनिरुद्ध बाराथे सर स्वतः या सफरीचे सूत्रधार होते. मुळातच बोलण्याची शैली नागराज मंजुळे सारखी असलेले नितीन जाधव हे आमचे कर्णधार होते.
     नावात घनिष्ठ शत्रुत्व पण सर्वांशी मैत्रीचा दुवा असलेले शत्रुघन शिंदे, भारताच्या ऐतिहासिक दौलतीची माहिती देण्यासाठी दौलत नाईकवडे हे पर्यटक मार्गदर्शक होते. सफरीतील आठवणींचा अनमोल ठेवा छायाचित्रीत करण्यासाठी अमोल, आपल्या मनमोकळ्या स्वभावाने सर्वांमध्ये समाविष्टीत होणारी अश्विनी. स्वप्नातील आकाशात चाळीस तारे भ्रमंतीसाठी निघाले होते.
      विशेष दृष्टीच्या व्यक्तींनी स्पर्शाच्या, अनुभूती च्या माध्यमातून आणि आपल्या सोबत असणाऱ्या डोळस मित्रांच्या डोळ्यांतून पाहिलेल्या उत्तर भारताच्या सफरीचे प्रवास वर्णन आपल्या समोर मांडताना अत्यंत आनंद होत आहे. सफरीची सुरुवात फतेपुर मधल्या बुलंद दरवाजा वर मनाचे बुलंद दरवाजे मैत्रीसाठी उघडून झाली. आग्रा शहरात गेल्यावर समजलच नाही की जगातील प्रेमाचं प्रतीक म्हणून अजरामर असलेली इमारत, भारताच्या हृदयातील पांढर्‍याशुभ्र संगमरवरी दगडाने बांधलेला, जगातील सात आश्चर्यांपैकी एक समजला जाणारा ताजमहाल पाहून आम्हा सर्वांच्या मनात प्रेमाची लाट कधी येऊन गेली. सायंकाळच्या वेळी सोनेरी दुधी गुलाबी दिसणारा ताजमहाल आमच्या आयुष्यात वेगवेगळे रंग भरत होता आणि यासोबतच यमुना नदीच्या तीरावर आम्हा सर्वांना मधील मैत्री यमुनेच्या पाण्यासारखी पुढे पुढे वाहत होती. पहिल्या दिवशी यमुनेच्या तीरावर सूर्य लाल तांबूस आणि सोनेरी रंगाची उधळण करत मावळत होता आणि दोन पाखरांचा मनात तोच सूर्य गुलाबी रंग उधळत उगवत होता.
     ताजमहाल पाहून मनातील गुलाबी रंगाची उधळण करत करत दुसऱ्या दिवशी सकाळी कधी दिल्लीत स्वारी आली ते कोणालाच समजलं नाही. लाल किल्ल्यावर डौलत  फडकणारा तिरंगा पाहून सर्वांचा मान राष्ट्रभक्तीने भरून आलं आणि मग काय सुरू झाला दिल्ली शहरात राजकीय ठिकाणांचा प्रवास. राजधानीची संपूर्ण माहिती घेत आमचा ताफा राजधानीतील महत्त्वाच्या रस्त्यांनी संसद भवन, सर्वोच्च न्यायालय, भारत सरकारची वेगवेगळी मंत्रालये  पाहत राष्ट्रपती भवनाकडे गेला. भारताच्या भव्यतेला शोभेल असे राष्ट्रपती भवन पाहून आम्ही हरखून गेलो. भारताचा राजदरबार असलेल्या दरबार हॉलमध्ये बसण्याचा अनुभव हा तर आयुष्यात अविस्मरणीय क्षणाचा ठेवाच देऊन गेला. राष्ट्रपती भवनातील राजशिष्टाचार आणि स्थापत्यशास्त्र हे विस्मयचकित करणारे होते. दरबार हॉलमध्ये बसण्याचा किंवा अशोका हॉलमध्ये बॉल डान्स-फ्लोअरवर उड्या मारण्याचा अनुभव मनाच्या पटलावर सुंदर क्षणांच्या रूपात कोरला गेला. मुगल गार्डन मधील उसळणारे कारंजे आणि सुंदर सुंदर फुलांचे सुवास आजही मनात दरवळत आहेत.
     राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणातून दरबार हॉलच्या घुमटावर फडकणारा राष्ट्रध्वज पाहून दिल्लीत राष्ट्रीय युद्ध स्मारक इंडिया गेट व 1971 पासून सातत्याने जळत असलेली अमर जवान ज्योती पाहून दिल्लीत सूर्य मावळला. रात्रीच्या गर्भात दिल्ली सोडली आणि सकाळी सज्ज झालो ते एका अविस्मरणीय प्रवासासाठी.

      त्यादिवशी पहाट झाली सुंदर क्षणांच्या रूपात दवबिंदुंचा सडा पाडतच, पहाटेने आम्हाला खूप काही द्यायचं ठरवलं होतं. शिवालिकच्या सुंदर टेकड्यांमधून नागमोडी वळणं घेत सकाळ होताच हिरव्यागार डोंगर-दऱ्यांतून सूर्याने दर्शन दिले, आणि मनावर मोहिनी मंत्र टाकणारया प्रकृतीच्या सौंदर्याचा प्रभाव आमच्यावर पडला. हिरवीगार उंच देवदार ची झाडे, खोलवर गेलेल्या दऱ्या, उंच उंच पर्वत शिखरे, आणि वृक्षराजी मधून जाणारी आमची रेल्वे गाडी सर्व काही नवीनच होतं पण थक्क करणारं होतं. अवर्णनीय प्रकृती सौंदर्य हे स्वप्नातलं असल्यासारखं भासत होतं आणि अशा सुंदर टेकड्यांमधून नागमोडी वळणे घेत आम्ही शिमला कडे जात होतो. एक वेगळीच सकाळ होती ती गाण्यांच्या भेंड्या, लोकांना लावलेल्या शेंड्या, अणि एकमेकांना चिडवत आम्ही शिमला मध्ये पोहोचलो.
     थंडगार वार्‍याने स्पर्श करून आमचं स्वागत केलं. दुपारच्या थंड हवेत फिरण्यासाठी सर्वकाही आवरून चहा पिण्याचा हेतूने हॉटेल सोडलं आणि चहा पाजतो पाजतो म्हणून चार तास शिमला मध्ये कसे फिरलो ते कळलेच नाही. थंडीत फिरताना एक वेगळीच मजा येत होती यामध्ये क्राइस्टचर्च, मॉल रोड, द रीज यांसारख्या जागा पाहून अक्षरशहा श्वास रोखले जात होते. एखाद्या सौंदर्यवतीने आपल्या अनमोल सौंदर्याने प्रियकराला आकर्षित करावं असं आम्ही या शहराच्या प्रेमात पडलो. मैत्री पॉइंट वर सूर्यास्ताच्या वेळी गप्पागोष्टी करत शिम्ल्यच्या थंडीमध्ये मैत्रीला कडकपणा देण्यासाठी चहाची फर्माईश झाली, आणि आम्ही ती पूर्णही केली. आमच्या मैत्रीच्या नात्यांतील सर्वात सुंदर क्षण होता तो सूर्य क्षितिजावर डोंगराच्या आड लपत होता, हिरव्यागार डोंगरांमधून दिव्यांचा उजेड येत होता, आणि निळसर सोनेरी आकाशात आमच्या मैत्रीची छटा पसरलेली होती, खरंच आयुष्यात छोटे छोटे क्षण सुद्धा खूप मोठे रंग भरून जातात.
     या शहराला पहाडों की रानी असंही म्हटलं जातं आणि अशा या राणीच्या सानिध्यात आमच्या मैत्रीची कहाणी लिहिली जात होती. दुसऱ्या दिवशी गार थंडीत आम्ही बाहेर पडलो ते एका नव्या उत्साहाने, शहराबाहेरचं प्रकृती सौंदर्य पाहण्यासाठी. कुफ्री चा टेकड्यांवरून हिमालयाचे दर्शन झालं. त्यानंतर ऐडवेंचर पार्क मध्ये सर्वांनी खूप धमाल केली, आपल्या अभूतपूर्व सौंदर्याने भुलवणारी ग्रीन व्हॅली आम्हाला तिच्या सौंदर्याचा मोहात पाडून मागे गेली. तो दिवस संपूच नये असं वाटत असतानाच अनपेक्षितपणे संध्याकाळ झाली आणि सुरू झाला परतीचा प्रवास. स्वप्नाच्या आकाशातील भ्रमण ती आता खरी सुरू झाली, आणि या शहरात परत कोण कधी, कोनसोबत, आणि कुठल्या उद्देशाने येणार याची प्रतिज्ञा करूनच सर्वांनी तृप्तपने शिमला चा निरोप घेतला आणि अग गाडीमध्ये पाऊल ठेवले.
     आमच्यासोबत या प्रवास वर्णनाच्या माध्यमातून ही ‘अनोखी सफर’ आपल्याला नक्कीच आवडेल यामध्ये उत्तर भारताचे माहितीने ओतप्रोत भरलेले प्रवास वर्णन, अभूतपूर्व मैत्रीचा संगम, आणि ताजमहालच्या गुलाबी हवेत रंगलेली, शिवलीक्च्या टेकड्यांमधून वळणे घेत जाणारी, मनाला वेड लावणारी प्रेम कहाणी आपल्याला बेचैन केल्याशिवाय सोडणार नाही.

अश्याच प्रकारचे लेख व कविता वाचण्यासाठी येत रहा
Follow me on web

https://airchallengertejas.blogspot.com/



 


Post a Comment

0 Comments