प्रिय वाचक मित्रांना मनःपूर्वक नमस्कार!!
मागील ब्लॉग ला आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार.
आपल्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी लिहून आपण मोठ्या संख्येने त्या वाचल्यावर आणखी लिहीण्यासाठी उत्साह येतो.
आज मी आपल्याला सांगणार आहे
एका चहा ची गोष्ट
शीर्षक वाचून आपण विचार कराल की नेमकी चहाची गोष्ट काय असेल. शेवटी, तो चहा तर आहे. त्यात एवढं विशेष काय?
जर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचलात, तर तुम्हाला आयुष्यात उपयोगी पडतील अशा दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळतील.
गोष्ट पाच वर्षांपूर्वीची आहे. 2015 मध्ये मी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं, एका वेगळ्याच प्रवासाला सुरुवात झाली. महाविद्यालयीन इतरांसारखी माझीही स्वप्न होती. स्वप्न कसे पहावे आणि ते कसं पूर्ण करावे याची मात्र काहीच कल्पना नव्हती. तेव्हा स्वप्न म्हणजे रात्री पडणारी वाटायची, काळाने सांगितले झोपेत पडलेली स्वप्न ही खूप कमी प्रमाणात सत्यात उतरतात.
स्वप्न ते नसतात जे रात्री पडतात
स्वप्न ते असतात जे आपण दिवसा पाहतो आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो.
जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा मीही एक स्वप्न पहायचं ठरवलं. माहित नव्हतं पूर्ण होईल की नाही पण स्वतःला आवाहन मात्र दिलं. त्यावेळी व्हिजन ट्वेंटी-ट्वेंटी खूप ऐकण्यात होतं. माझं व्हिजन ट्वेंटी-ट्वेंटी ठरवलं. तारीख 20 जानेवारी 2020 ज्या दिवशी जगप्रसिद्ध अशा पंचतारांकित ताज हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी का होईना पण जायचं. हे मी पाहिलेलं (दिवसा पाहिलेलं) एक स्वप्न, त्यावेळी अकल्पित आणि अशक्य वाटायचं. त्याला कारणही तसंच होतं. ज्या लोकांबरोबर मी राहत होतो, ना ते कधी ताजमध्ये गेले होते, कधी जाण्याचा विचार त्यांनी केला होता. अशावेळी मी तो विचार करणे म्हणजे काही वेगळेच होते.
तुम्ही विचार करत असाल की मी असं स्वप्न का पाहिलं? माणसाच्या जडणघडणीत आजूबाजूच्या वातावरणाचे खूप महत्त्व असते. याचे कारण असे जो माणूस श्रीमंतांमध्ये वाढला, तो गरिबीचा विचार करत नाही. जो माणूस गरिबीत वाढला, तो श्रीमंतीचा विचार करणे मोठा घास घेणे समजतो. थोडा प्रत्यक्षदर्शीlपणाने विचार केला तर तुमच्याही हेच लक्षात येईल, माणसाला महत्व तो कशा वातावरणात राहतो यावरून प्राप्त होते. एखादा माणूस जर मंदिरात राहत असेल तर तो पुजारी म्हणून ओळखला जातो, तोच माणूस आपल्या विद्वत्तेने विद्यार्थ्यांना शिकवत असेल तर तो गुरू समजला जातो. माणूस एकच आहे पण तो कशा प्रकारच्या वातावरणात राहतो त्यावरून त्याला महत्त्व प्राप्त होते.
वरील कारणांसाठी मी अशा प्रकारच्या जागी जायचं ठरवलं, हे पाहण्यासाठी तिथे येणारे लोक कशा प्रकारचे असतात, ते कसे राहतात, कसे बोलतात, कसे चालतात, कशा प्रकारचे विचार करतात. पहिल्यापासूनच मला वेगवेगळ्या जागी जाण्याची आवड असल्यामुळे मी (द ताजमहाल पॅलेस हॉटेल मुंबई) ची निवड केली. पण शेवटी एक स्वप्न होतं, प्रबळ इच्छाशक्ती असल्यामुळे मी दिवस आधीच ठरलेला होता. त्यासंबंधित कल्पनाही मनात येत होत्या. दर वर्षातून 50 ते 60 वेळा तरी मी या गोष्टीचा विचार करत होतो की आपले व्हिजन ट्वेंटी-ट्वेंटी हे ताज मध्ये जाणे आहे.
आकर्षणाचा नियम असे सांगतो, ज्या गोष्टींचा आपण विचार करतो, त्याच गोष्टी आपल्या बाबतीत घडतात.
याचा अर्थ असा, आपल्या आयुष्यात घडणारी कोणतीही गोष्ट ही आपल्या विचारांचा परिणाम असतो. आपल्याला काय करायचे आहे हे आपण आपल्या मेंदूला सांगून ठेवले की आपला मेंदू त्या गोष्टी आपल्यासाठी घडवून आणण्याची व्यवस्था करतो. तुम्हाला तर माहीतच असेल की माणसाचे मन हे त्याला कितीही मोठ्या उंचीवर नेऊन शकते. फक्त आपल्या मनापर्यंत आपले विचार प्रबळपणे पोहोचणे आणि त्याप्रमाणे प्रयत्न होणे आवश्यक असते. आपल्या मनापर्यंत आपले विचार कसे पोहोचवावेत? याचे उत्तर असा आहे आपले मन हे प्रतिमांच्या स्वरूपात काम करत असते. आपण जे विचार करतो ते प्रतिमांच्या स्वरूपात मनापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. थोडक्यात जर मला ताज हॉटेल ला जायचे आहे तर मी तिथे गेल्याची आभासी प्रतिमा माझ्या मनात आधीपासूनच असायला हवे आणि त्यावर मला पूर्णपणे विश्वास असायला हवा.
1 जानेवारी 2020 या दिवशी व्हिजन ट्वेंटी-ट्वेंटी मनाची उत्सुकता वाढवत परत एकदा पटलावर आलं. आणि माझ्या वर्ग मित्राला नववर्षाच्या शुभेच्छा देताना माझी ही कल्पना मी त्याला सांगितले. सुरुवातीला त्याच्या डोक्यात ही कल्पना लवकर शिरली नाही पण जेव्हा त्याला मी वातावरण माणसात कशाप्रकारे बदल घडवू शकते हे सांगितले तेव्हा त्याला ही गोष्ट आवडली.
कैलास मनोहर हा माझा अकरा वर्षांपासून असलेला वर्गमित्र माझ्याबरोबर यायला उत्सुक होता. दिवस उगवला, 20 जानेवारी 2020 आणि मी पुण्यावरून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या माझा आवडता गाडीने म्हणजे डेक्कन क्वीन एक्सप्रेने प्रवास सुरू केला. व्हिजन ट्वेंटी-ट्वेंटीसाठी जाताना निवडलेली गाडीसुद्धा मोठा इतिहास असलेली होती. कैलास मुंबईत असल्यामुळे तो मला मुंबईतच भेटणार होता. त्याच्यासोबत अजून एका मित्राला येण्यासाठी त्याने राजी केले. शत्रुघन शिंदे हा आमचा रेल्वे पोलीस मित्र सोमवारी त्याला सुट्टी असल्यामुळे आमच्यासोबत येणार होता. मी सुद्धा माझ्याबरोबर पुण्यावरून माझ्या एका मैत्रिणीला सोबत घेऊन गेलो. मुंबईत उतरताच उत्सुकता क्षितीजावर जाऊन पोहोचली. मुंबईच्या वेगवेगळ्या गोष्टी पाहून सव्वादोन वाजता आमची पावलं ताज कडे वळली. दोन वाजता जाण्याच कारण असतं मुंबई महानगरपालिकेचे कार्यालय हे त्यावेळी सुटते आणि आमचा वर्गमित्र तेथूनच येत होता.
सीएसएमटी पासून पोस्ट ऑफिस, स्टेट बँक, रिझर्व बँक, मुंबई बंदर, अशा मार्गाने आम्ही गेटवे ऑफ इंडियाला पोहोचलो. उत्सुकता आणि धडधड थांबवण्यासाठी आम्ही सर्वांनी ताच्या बाहेर थोडेसे फोटो काढले. या बाजूने दिसणार समुद्राचा दृश्य हे खूपच सुंदर होतं. जगप्रसिद्ध अशा पंचतारांकित हॉटेलमध्ये फक्त चहा प्यायला जायची कल्पना सुरुवातीला धडकी भरवणारी होती.
मी मनाचा हिय्या करून ताच्या गेटमधून आत प्रवेश केला. एका स्वागतिकाने आम्हाला शामियान्यात सोडवले. आम्ही शामियाना नावाच्या ताजमधील एका उपहारगृहात पाऊल टाकतात हरखून गेलो. भव्य अशी इमारत, मनाला मोह पडेल अशी सजावट, आमच्या मनावर अधिराज्य गाजवत होती.
काचेच्या ग्लासात पाणी पिल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या चहाची ऑर्डर दिली. चारशे रुपयाला एक चहा ही किंमत आम्हाला नवीन नव्हती, कारण आम्हाला ती आधीच माहित होती. जसे मी आपल्याला सांगितले की कोणत्याही ठिकाणी जाण्यासाठी त्याठिकाणची आभासी प्रतिमा आपल्या मनापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. याच गोष्टीसाठी मी त्याची संपूर्ण माहिती आपल्या मनामध्ये पोहोचवली होती. याच कारणामुळे तर त्या दिवशी मी शामियाना रेस्टॉरंटमध्ये होतो. देशातील सर्वोत्कृष्ट चहाच्या मळ्यावरून आलेला चहा, सर्वोत्कृष्ट अशा चिनी माती पासून बनवलेल्या जगप्रसिद्ध ब्रँडच्या कपाटांत आमच्या समोर ठेवला गेला. स्वप्नपूर्तीच्या आनंदाने त्या चहाला एक वेगळ्याच प्रकारची चव प्राप्त करून दिली. फक्त चहा पिण्यासाठी आम्ही एक तास वेळ ताजमध्ये घालवला याचे कारण असे, तेथील उत्कृष्ट सजावट, वेगवेगळे लोक आणि वातावरण यामुळे वेळ कसा गेला हे आम्हाला समजलेच नाही.
चहा पिणे बरोबरच तेथील उत्कृष्ट वातावरणाचा अनुभव हा काही वेगळाच होता.
तेथे येणारे लोक हे पैशाची कमी नसलेले, आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय श्रीमंत होते. त्यांचे राहणीमान, चालण्याची ढब, बोलण्याची शैली, ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभेल अशीच होती. हेच तर पाहण्यासाठी आम्ही येथे आलो होतो. शब्दांमध्ये सांगणे तसे कठीण आहे. हा अनुभव विचारांची उंची वाढवणारा होता. तेथे चहा पिल्यानंतर आम्हाला हे समजले.
जर आपले विचार एखाद्या ठिकाणी पोहोचू शकत असतील मग ते कितीही अशक्य असो!!
थोडक्यात काय हो!! सगळा आपल्या मनाचा खेळ आहे. जर तुमचं मन चहा साठी दोन हजार रुपये खर्च करण्याची ताकद तुम्हाला देत असेल तर तुम्ही तेवढे खर्च करू शकता.
दुसरी गोष्ट अशी की ताज मध्ये चहा एवढा मान का? भारतात करोडोंच्या संख्येने चहा विक्रेते आहेत. कोणी आपला चहा पाच रुपयांना विकतो तर कोणी दहा रुपयांना, कोणी तो स्पेशल बनवून 15 रुपयांना, तर कोणी पंचवीस रुपयांना. चहा ज्या ठिकाणी ज्याप्रकारे विकला जातो त्यावरून चहाची किंमत ठरते. जर तुम्ही महोगणी लाकडाच्या टेबलवर लाखो रुपयांच्या किमतीची झुंबर असलेल्या जागी हजार रुपयांच्या कपामध्ये चहा पीत असाल तर त्यासाठी चारशे रुपये काय 4000 कमी पडतील.
सांगायचं हेच की वस्तूचे प्रत्यक्ष मूल्य आणि आभासी मूल्य हे वेगवेगळे असते. प्रत्यक्ष मूल्य हे त्यासाठी आलेल्या खर्चावरून निश्चित होते. आभासी मूल्य हे तेथील वातावरणामुळे आणि सोयीसुविधांमुळे निश्चित होते. वरील गोष्टीवरुन आपल्याला समजले असेल की चहाला पाच रुपये ही किंमत तशाच जागी विकल्यामुळे मिळते तर तो चहा ताज सारख्या जगप्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये विकला तर त्याला चारशे रुपयांची किंमत प्राप्त होते.
माणसाची ही किंमत अशाच प्रकारे ठरवली जाते
जर माणूस सामान्य जागी सामान्य प्रकारे राहत असेल तर तो सामान्य ठरतो!!
तोच माणूस असामान्य कर्तृत्व आणि असामान्य अशा उंचीवर पोहोचवून इतरांसाठी प्रेरणा बनतो.
जर असामान्य विचार करण्याची शक्ती आपल्यामध्ये असेल
जर असामान्य विचार पेलण्याची ताकद आपल्या मनामध्ये असेल तर आपण कोणत्याही उंचीवर जाऊ शकतो.
ताज मधून बाहेर पडल्यावर आमच्या या गोष्टी लक्षात आल्या. आणि स्वतःच्या मनाला मोठ्या उंचीवर नेण्याची प्रतिज्ञा करूनच आम्ही ताज मधून बाहेर पडलो.
जर मी पाच वर्षांपूर्वी विचार केला नसता तर कदाचित मी ताजमध्ये जाऊ शकलो नसतो.
ताजमध्ये जाऊन आल्यानंतर चार महिन्यांनी आज आमची मनस्थिती कितीही मोठे विचार आणि स्वप्न पाहण्याची आहे. आमच्या मधील प्रत्येक जण हा आपली कार्यक्षमता आणि गुंतवणुकीच्या जोरावर स्वतःला आर्थिक दृष्ट्या असामान्य बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
मित्रांनो ही चहाची गोष्ट आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा.
जर आपल्याला ही गोष्ट आवडली असेल आणि आपण यातून काही शिकला असाल तर इतरांबरोबर नक्की शेअर करा.
करुणा संसर्गाच्या काळात घरात राहून देशाला सहकार्य करा वया खतरनाक विषाणूपासून सर्वांचे रक्षण करा.
1 Comments
आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा प्रतिक्रिया कळविण्यासाठी संपर्क करा
ReplyDelete7507892490 या व्हाट्सअप वर
या ब्लॉगशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या प्रतिक्रिया देण्यासाठी खाली दिलेल्या बटनवर क्लिक करा कोणत्याही प्रकारच्या संपर्कासाठी ई-मेल करा